भारतीय जनता पक्षाच्या पॅनलच्या प्रचारसभेत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दमदार उपस्थिती दर्शवत श्रीगोंदा शहराच्या भवितव्याचा रोडमॅप स्पष्ट केला. “श्रीगोंदा शहर आणि तालुका राज्यातील अव्वल पाच शहरांमध्ये आणण्याची क्षमता आपल्या टीममध्ये आहे. शहराचा विकास कुठेही कमी पडू देणार नाही. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांना मदतीची गरज भासली, तर मी स्वतः मुंबईला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेन,” असा ठाम शब्द माजी मंत्र्यांनी दिला.
सभेत उसळलेल्या गर्दीला उद्देशून ते पुढे म्हणाले,“२३ पैकी २३ जागा आमच्या पॅनलला मिळाल्या, तर श्रीगोंद्यात विकासाची गंगा वाहील. यापूर्वी केलेला विकास तुम्ही पाहिलाच आहे, आणि पुढील काळात तो दुप्पट गतीने होईल. ‘टायगर अभी जिंदा है!’”
पाचपुते यांच्या भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची नवी ऊर्जा निर्माण केली. शहराच्या पाणीपुरवठा, रस्ते सुधारणा, क्रीडा संकुल, सांडपाणी प्रकल्प, स्मार्ट सुविधा या सर्व योजनांचा आराखडा त्यांनी सभेत मांडत मतदारांचा विश्वास दुणावला.
अखेरच्या शब्दांत त्यांनी पुन्हा एकदा आवाहन केले, “श्रीगोंदाचा विकास हा आमचा धर्म… तुमचा आशीर्वाद हा आमचा बळ… २३/० चा विजय इतिहास घडवेल.”प्रचारसभेचा नाद, घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता निवडणुकीचा रंग अधिकच चढल्याचे चित्र दिसून आले.
