महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. गौरी गणेश भोस यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त जनसमर्थन

श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक जवळ येत असताना महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. गौरी गणेश भोस यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असून शहरातील वातावरणात सकारात्मकतेची नवी ऊर्जा जाणवत आहे. प्रभागनिहाय दौरे, नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद आणि शहराच्या विकासाबाबतची व्यापक दृष्टी या सर्वांमुळे सौ. भोस यांच्या प्रचाराला लक्षणीय गती मिळाली आहे.

 

प्रचारसभांमध्ये सौ. भोस यांनी श्रीगोंदासाठी स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार शहराचा आराखडा मांडला. शहरातील कचरा व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण, पाणीपुरवठा सुसूत्रीकरण, नाल्या व ड्रेनेजच्या नियोजनबद्ध प्रणालीसह नागरी भागात स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचा त्यांचा संकल्प आहे.

 

शहराला भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर त्या अधिक गांभीर्याने भाष्य करतात. बायपास रस्ता, स्मार्ट पार्किंग हब, चौकांचे पुनर्रचना व वाहतूक संकेत यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सुकर करण्याचे नियोजन त्यांनी प्रचारादरम्यान स्पष्ट केले. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे उपाय कारगर ठरतील, असा विश्वास व्यावसायिक व वाहनचालकांनी व्यक्त केला आहे.

 

प्रत्येक प्रभागात उद्याने, जॉगिंग ट्रॅक, वाचनालये आणि सांस्कृतिक सभागृहे उभारण्याची घोषणा सौ. भोस यांनी केली आहे. मुलांसाठी सुरक्षित व आधुनिक खेळणी, महिलांसाठी फिटनेस झोन आणि युवकांसाठी अभ्यास व कौशल्यविकास केंद्रांच्या निर्मितीमुळे शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात गुणात्मक बदल संभवतील, असा त्यांचा विश्वास आहे.

 

“श्रीगोंद्यातील प्रत्येक प्रभागाचा समान आणि न्याय्य विकास हा माझ्या कामकाजाचा केंद्रबिंदू असेल. काही भाग नव्हे तर संपूर्ण शहर प्रगत व्हावे,” असे सांगून निधीवाटपात पूर्ण पारदर्शकतेची हमी सौ. भोस यांनी दिली.

 

प्रचारादरम्यान घडलेल्या एका प्रसंगाने वातावरण भावूक झाले. शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाने त्यांचा हात धरत “तुम्ही जिंकलात तर शहर जिंकेल” असे म्हटल्यावर सौ. भोस म्हणाल्या, “माझं यश हे माझं नसून श्रीगोंदाच्या भविष्याचं असेल. मला एक संधी द्या, मी शहराच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करेन.”

 

प्रचारात वाढणारा नागरिकांचा ओढा, विविध घटकांकडून उमटत असलेला सकारात्मक प्रतिसाद आणि सौ. भोस यांच्या उमेदवारीवर दिसणारा विश्वास पाहता महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बाजूने शहरात चांगले वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.