श्रीगोंदा : ओंकार शुगर ग्रुपने आपल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तब्बल २० टक्के पगारवाढ जाहीर केली असून या निर्णयामुळे समूहातील सुमारे १६,५०० हून अधिक कर्मचारी लाभार्थी ठरणार आहेत. या वाढीची माहिती ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांनी दिली.
बोत्रेपाटील म्हणाले, “कर्मचारी हीच ओंकार शुगर ग्रुपची खरी ताकद आहे. त्यांच्या कठोर परिश्रमांमुळेच समूहाने अल्पावधीत राज्यातील १८ साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन करून उत्पादन क्षमतेत उल्लेखनीय वाढ साध्य केली आहे. ही पगारवाढ म्हणजे त्यांच्या परिश्रमाचे, निष्ठेचे आणि त्यागाचे मोल आहे.”
पगारवाढ लागू झाल्यानंतर कर्मचार्यांच्या आर्थिक स्थैर्यात वाढ होऊन त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास बोत्रेपाटील यांनी व्यक्त केला. आगामी गाळप हंगामात यामुळे कर्मचारीवर्ग अधिक उत्साहाने कामाला लागेल, असेही त्यांनी सांगितले.
ओंकार शुगर ग्रुपकडून दिलेली ही मोठी दिलासा देणारी घोषणा साखर उद्योगात सकारात्मक पाऊल मानली जात असून कर्मचारीवर्गात समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
