श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. गौरी गणेश भोस यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद शहरातील जनमत कोणत्या दिशेने झुकत आहे, याची स्पष्ट जाणीव करून देणारा ठरत आहे.
गेल्या काही काळात संवादाचा अभाव, मतभेद आणि त्यातून निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे शहराचा विकास ज्या गतीने व्हायला हवा होता, त्या गतीने झाला नाही. हा सर्व अनुभव डोळ्यासमोर ठेवत सौ. गौरी भोस यांनी “निर्णय प्रक्रियेत जनता केंद्रस्थानी असेल… प्रत्येक निर्णय पारदर्शकपणे आणि सर्वांच्या सहभागातूनच होईल,” अशी ठाम भूमिका “जन स्पंदन” शी बोलताना व्यक्त केली.
त्यांनी कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक टीका-टिप्पणीला बगल देत फक्त विकास, सुविधा आणि सुयोग्य प्रशासन यावरच लक्ष केंद्रीत ठेवले आहे. गौरी भोस यांच्या प्रचारातील महत्त्वाची बाजू म्हणजे त्यांचे कुटुंबातील मूल्य, सामाजिक कार्याचा वारसा आणि शांत नेतृत्वाचा आदर्श. शहरात लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या बाबासाहेब भोस यांची संयमी कार्यशैली हा त्यांच्या वाटचालीचा आधारस्तंभ ठरत आहे. “त्यांनी दिलेला लोकसेवेचा आदर्शच मला योग्य दिशा दाखवतो,” असे त्या भावनिक शब्दांत सांगतात.
नागरिक, महिला वर्ग, तरुण कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक सर्वच घटकांकडून त्यांना मिळणारा विश्वास हेच त्यांच्या प्रचाराचे खरे बळ. शहरात सरळ, स्वच्छ आणि जबाबदार कारभाराची अपेक्षा वाढली असून गौरी भोस त्या अपेक्षेचे उत्तर देणारे नवे नेतृत्व ठरू शकते, अशी भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
