संघर्षातून उमेदवारीपर्यंत… सुनीता खेतमाळीस यांची साधेपणातून उभी राहिलेली हृदयस्पर्शी वाटचाल

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्षा पदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनीता संतोष खेतमाळीस यांचा प्रत्येक दिवस त्याच साधेपणाने उगवतो जसा त्यांनी आयुष्यभर जगलेला आहे. कोणतीही दिखाऊपणा नाही, कोणतेही वेगळेपण नाही… फक्त कष्ट, कुटुंबाची जबाबदारी आणि समाजासाठी असलेली निष्ठा.

 

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुनीता खेतमाळीस यांनी आयुष्यभर कष्ट आणि शिस्त यांनाच आपली ओळख बनवली. घर, संसार आणि शेतीच्या आघाड्या सांभाळण्यात त्या तितक्याच समर्थ, तितक्याच कुशल. वादळ असो की उन्हाची तिरीप घराच्या उंबरठ्यावर आणि शेताच्या रानात त्या दोन्हीकडे तितक्याच ताकदीने उभ्या राहिल्या.

 

मात्र, कोरोना काळाने त्यांच्या आयुष्यात अंधाराची खोल दरी निर्माण केली. पती संतोष खेतमाळीस यांच्या अकाली निधनाने संसाराचा संपूर्ण भार त्यांच्या खांद्यावर आला. दु:खाचा डोंगर कोसळला, पण मनाची ताकद तुटू दिली नाही. पतीच्या आठवणीच त्यांचे आजचे बळ आहेत. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत समाजकारणाची साखळी पुढे नेण्याची प्रेरणा त्या आजही घेतात.

 

निवडणुकीच्या प्रचारात देखील सुनीता ताईंची शैली साधी, थेट आणि मनाला भिडणारी. राजकारणात नाव, पद वा सत्ता नव्हे; तर नागरिकांशी विश्वासाचा पूल बांधणे हेच त्यांचे ध्येय. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक वस्तीमध्ये त्या जाऊन महिलांच्या अडचणी समजून घेतात, वयोवृद्धांच्या समस्या ऐकतात, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते अशा मूलभूत सुविधांसाठी लढण्याची हमी देतात.

 

त्यांच्या सभोवतालची लोकंही सांगतात. “ही उमेदवार नाही… घरातीलच मुलगी वाटते. मनाने स्वच्छ, बोलण्यात प्रामाणिक, आणि कामात प्रामाणिकपणा दिसतो.”

 

शेतकरी कुटुंबातील संघर्षातून पुढे आलेली ही महिला आज नगराध्यक्षा पदाची उमेदवार आहे; पण मनात कोणतेही अहंकाराचे ओझे नाही. फक्त एकच ध्येय “श्रीगोंदा शहरातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे.”

 

सुनीता खेतमाळीस यांचा दिवस जसा साधा, तितकाच ताकदीचा… आणि त्यांची ही साधेपणाची वाटचालच आज श्रीगोंद्यातील अनेकांच्या मनाला भिडते आहे.

 

 

(गणेश कविटकर, श्रीगोंदा)