श्रीगोंदा तालुका खादी ग्रामोद्योग संघात बदलता समीकरणांचा प्रभाव मयुर गोरखे यांची व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड

श्रीगोंदा : जिल्हा बँकेचे संचालक व माजी आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखालील गटाने पुन्हा एकदा आपली संघटनात्मक ताकद दाखवत श्रीगोंदा तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या उपाध्यक्ष (व्हाइस चेअरमन) पदावर मयुर गोरखे यांची बिनविरोध निवड करून राजकीय वर्चस्व अधोरेखित केले.

पूर्वी हे पद बबन श्रीराम यांच्याकडे होते. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. नव्या निवडीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार राहुल जगताप यांनी थेट हस्तक्षेप करत संचालकांना मयुर गोरखे यांच्या नावास समर्थन देण्याचे निर्देश दिले. परिणामस्वरूप कोणताही विरोध न होता गोरखे यांची निवड निश्चित झाली.

या निवडीसाठी खादी ग्रामोद्योग संघातील ज्येष्ठ नेते व माजी चेअरमन अंकुश शिंदे, विद्यमान चेअरमन बापूसाहेब गायकवाड यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. मयुर गोरखे हे राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीचे सदस्य असून स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या उमेदवारीवर संचालक वसंतराव सकट यांनी सूचक तर चेअरमन बापूसाहेब गायकवाड यांनी अनुमोदन दिले. एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मुंडे यांनी गोरखे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.

निवड जाहीर होताच माजी आमदार राहुल जगताप, राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा, मनोहर पोटे आदींनी गोरखे यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. निवड प्रक्रियेच्या वेळी संचालक वसंतराव सकट, रमेश कळमकर, नानासाहेब ससाणे, धनंजय लोखंडे, दिलीप तोरडमल, सुनील काळे, रेवती घाडगे, मीरा शिंदे उपस्थित होते.

या निवडीमुळे खादी ग्रामोद्योग संघात राहुल जगताप गटाचे वर्चस्व अधिक मजबूत झाले असून आगामी स्थानिक निवडणुकांवर या घडामोडींचा थेट परिणाम होणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

 

 

 

(गणेश कविटकर, श्रीगोंदा)