साहित्यिक श्रीकांत उमरीकर यांनी पुरातन मंदिरदर्शनातून संत शेख महंमद महाराजांच्या चरणी १७०० वी उसंतवाणी अर्पण

जागतिक वारसा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहर ऐतिहासिक भावनेने भारावून गेले, कारण इतिहास अभ्यासक, साहित्यिक, बारव संवर्धन मोहिमेचे जनक आणि उसंतवाणी अभंगलेखनाचे लेखक श्रीकांत उमरीकर यांनी शहरातील पुरातन मंदिरांना भेट देत आपली १७०० वी उसंतवाणी संत शेख महंमद महाराजांच्या चरणी अर्पण केली.

आध्यात्म, इतिहास, वारसा संवर्धन आणि साहित्य यांचा अद्वितीय संगम असलेला हा प्रसंग पाहण्यासाठी राज्याबाहेरील तसेच परदेशातून आलेले वारसाशास्त्रप्रेमी पर्यटक विशेष उपस्थित होते. पुरातन मंदिरांची वास्तुशैली, ऐतिहासिक अवशेष, संस्कृतीचा वारसा यांचा अभ्यास करण्यासाठी उमरीकर परदेशी मित्रांसह श्रीगोंद्यात विशेष दौऱ्यावर आले आहेत.

स्थानिक सांस्कृतिक व इतिहासप्रेमींच्या मते, उमरीकर यांच्या भेटीमुळे श्रीगोंद्याच्या वारसा संवर्धन चळवळीला नवी ऊर्जा व दिशा मिळणार आहे. शहरातील प्राचीन देवस्थाने, दगडी शिल्पे व विस्मृतीत गेलेल्या वारशाकडे लक्ष वेधण्याचे कार्य उमरीकर गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने करत आहेत.

या प्रसंगी फ्रेंच मित्र व्हिन्सेंट, पुरातन वास्तू संवर्धन चळवळीतील कार्यकर्ते लक्ष्मीकांत सोनवटकर, शाश्वत पर्यटन अभ्यासक आकाश ढुमणे, तसेच देवेंद्र राक्षे, राजेश कुलकर्णी, रवींद्र रबडे, विद्याधर जोगळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीगोंद्यातील शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन आणि स्थानिक इतिहासप्रेमींनी उमरीकर यांचे स्वागत करत पुरातन वारशाचे संवर्धन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्यावर भर दिला. उमरीकर यांनी सादर केलेली १७०० वी उसंतवाणी, संतांचे वाङ्मय आणि श्रीगोंद्याचा ऐतिहासिक वारसा यामध्ये सुंदर नाळ जोडणारी ठरली. श्रीगोंद्याच्या इतिहासपानांवर नवे शिलालेख उमटवणारी ही भेट शहरातील वारसाप्रेमींमध्ये उत्साह निर्माण करणारी ठरली आहे.

 

 

( गणेश कविटकर, श्रीगोंदा )