चिंभळे उपबाजार समितीत भुसार मालाच्या लिलावाला सुरूवात शेतकऱ्यांना स्पर्धात्मक दर व पारदर्शी व्यवहाराची हमी

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य, स्पर्धात्मक व रास्त दर मिळावा, वजनातील फसवणूक थांबावी आणि पारदर्शक व्यवहार व्हावेत या उद्देशाने श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चिंभळे येथील उपबाजार आवारात भुसार मालाच्या खरेदी-विक्री लिलावास अधिकृत सुरूवात करण्यात आली. समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी ही माहिती दिली.

गुरुवार व रविवार अशा आठवड्यात दोन दिवस लिलावाचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटनाच्या दिवशीच मका, बाजरी, गहू अशा विविध पिकांच्या तब्बल ७१ टन एवढ्या भुसार मालाची १३ लाख रुपयांची आवक नोंदली गेली.

उपबाजार आवारात भुसार मार्केट सुरू करण्यासंदर्भात सभापती, उपसभापती, संचालक, व्यापारी व बाजार समितीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. परिसरातील शेतकऱ्यांना जवळच्या ठिकाणी पारदर्शी पद्धतीने विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

उपबाजारात भुसार मालाचा लिलाव मे. विश्वनाथ काशिनाथ निंबाळकर अँड सन्स, केडगाव कृषी विकास प्रोडूसर कंपनी लि., व विशाल शेठ निंबाळकर यांच्या मार्फत जाहीर लिलाव पद्धतीने गुरुवार आणि रविवारी पार पडणार आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासाला प्राधान्य देत शेतीमाल विक्रीचा हिशोब त्वरित दिला जाईल, अशी माहिती व्यापारी निंबाळकर यांनी दिली.

शेतमाल अधिक दर्जेदार आणि स्पर्धात्मक दरात विक्री व्हावी यासाठी निवडक, स्वच्छ व नीट वाळवलेला माल आणण्याचे आवाहन बाजार समितीचे प्रभारी सचिव राजेंद्र लगड यांनी केले.

या कार्यक्रमावेळी बाजार समिती संचालक नितीन डुबल, रामदास झेंडे, कुकडी कारखान्याचे व्हा. चेअरमन विवेक पवार, सरपंच प्रज्ञा सावंत, रमेश गायकवाड, राजेंद्र लकडे आदी मान्यवर उपस्थित होते. ही सुविधा सुरू झाल्याने चिंभळे परिसरातील शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवरच marked‐based दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शेतकरी हिताचा हा उपक्रम सकारात्मक ठरत आहे.

 

 

(गणेश कविटकर, श्रीगोंदा)