शिरपूर वरवाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मतदान कर्मचारी प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

शिरपूर – आगामी शिरपूर वरवाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत व निर्धोक पार पाडण्यासाठी आयोजित मतदान कर्मचारी प्रशिक्षण वर्ग भंडारी सभागृह, शिरपूर येथे यशस्वीरीत्या संपन्न झाला.

या निवडणुकीसाठी एकूण 400 मतदान कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले असून यापैकी 350 कर्मचारी उपस्थित होते, तर 50 कर्मचारी गैरहजर राहिले. अनुपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 मधील कलम 30 व 31 नुसार कारणेदाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत.

प्रशिक्षण सत्राचे मार्गदर्शन महेंद्र माळी (तहसीलदार, शिरपूर) आणि प्रशांत सरोदे (मुख्याधिकारी, नगरपरिषद शिरपूर) यांनी केले. तसेच निवडणुकीसंबंधी महत्त्वाच्या सूचनांचे सविस्तर मार्गदर्शन सी. एस. देशमुख (निवडणूक निर्णय अधिकारी) यांनी केले.

राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक देण्यात आले. मतदान यंत्राचे संचालन, मतदानाची संपूर्ण पद्धत तसेच मतदाराला असलेल्या तीन मतदानांच्या अधिकाराची प्रक्रिया याबाबत कर्मचाऱ्यांना सखोल प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, शिस्तबद्धता आणि मतदारांना मिळणाऱ्या सुविधा अधिक सक्षमपणे राबवण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

 

 

( गणेश कविटकर, श्रीगोंदा )