श्रीगोंदा : “गेल्या आठ वर्षांत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून आमच्या नगरपरिषदेत अनेक नवनवीन कल्पना राबविल्या. विविध शासकीय योजनांचा वेगवान आणि प्रभावी वापर करून विकासकामे सर्वत्र पोहोचवली. त्यामुळे प्रचारादरम्यान प्रत्येक प्रभागात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे,” असे प्रतिपादन शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शुभांगी पोटे यांनी प्रचारादरम्यान केले.
सौ. पोटे पुढे म्हणाल्या, “श्रीगोंदा नगरपरिषदेच्या ३० वर्षांच्या इतिहासात गेल्या नऊ वर्षांत सर्वाधिक आणि भरीव कामे झाली. माझे पती मनोहर पोटे यांच्या कार्यकाळानंतर मी नगराध्यक्ष म्हणून पाच वर्ष काम केले. या एकूण साडेसात वर्षांत शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य या मूलभूत क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवून आणला.”
रस्त्यांच्या समस्यांना दिली कायमस्वरूपी दिशा
शहरातील अनेक वाड्या–वस्त्यांमध्ये पावसाळ्यात दुरवस्थेचे रस्ते ही दीर्घकाळाची समस्या होती. “आम्ही आश्वासनांवर न थांबता थेट प्रत्यक्ष काम केले. प्रमुख रस्त्यांचे नूतनीकरण, गल्ल्यांमध्ये पेव्हिंग ब्लॉक, अरुंद मार्गांचे सुशोभीकरण—यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला,” असे सौ. पोटे यांनी स्पष्ट केले.
सातत्यपूर्ण देखरेख पाणीपुरवठ्यावर सतत लक्ष ठेवत दिवसाआड नियमित वितरण व्यवस्था सुरळीत ठेवली. “वीज पुरवठा खंडित होणे, पाइपलाइन फुटणे किंवा धरणावर वीज नसणे. कोणतीही समस्या आली तरी तात्काळ उपाययोजना करून पाणीपुरवठा खंडित होऊ दिला नाही,” असे त्या म्हणाल्या. आरोग्य विभागातही विविध उपक्रम राबवून नागरिकांना सेवा मिळावी यावर भर दिल्याचे त्यांनी सांगितले.
“कामे दिसत असल्याने विजय निश्चित” पोटे
“शहरात फिरताना नागरिक आमच्या कार्यकाळातील सुविधा आजही आवर्जून सांगतात. त्यांच्या समाधानातूनच आम्हाला पुन्हा उमेदवारी करण्याची प्रेरणा मिळाली. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे सर्व उमेदवार या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी होतील,” असा ठाम विश्वास सौ. शुभांगी पोटे यांनी व्यक्त केला.
(गणेश कविटकर, श्रीगोंदा)
