चिंचकुट वस्ती शाळेचा बदललेला चेहरा… अग्नीपंख फाउंडेशनचा ‘कांतिवीर महात्मा फुले सलाम’ उपक्रम प्रेरणादायी ठरला

हिरडगाव, ता. श्रीगोंदा — दुर्लक्षित, मागास आणि मर्यादित साधनसामग्री असलेली चिंचकुट वस्ती शाळा आज पूर्णपणे बदललेली दिसते… हा बदल घडवून आणला तो अग्नीपंख फाउंडेशनच्या ‘कांतिवीर महात्मा फुले सलाम’ या उपक्रमाने. लोकसहभाग आणि सामाजिक जाणिवेच्या बळावर उभा राहिलेला हा प्रकल्प ग्रामीण शिक्षणातील सकारात्मक परिवर्तनाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

 

लोकार्पण सोहळा उत्साहात –

 

सुधारणांचे लोकार्पण आपुलकी मिशनचे जिल्हा समन्वयक रमेश कासार, उद्योजक संजयकुमार मचे, गटविकास अधिकारी राणी फराटे, गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी आणि शालेय पोषण आहार योजनेचे तालुका अधीक्षक सत्यजित मच्छिंद्र यांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काकासाहेब गुणवरे होते.

 

चिंचकुट वस्ती शाळेत झालेले विकासकामे –

 

अग्नीपंख फाउंडेशनच्या पुढाकारातून शाळेत खालील दर्जेदार सुधारणांची अंमलबजावणी करण्यात आली. शाळेचे आकर्षक रंगकाम, सुबक प्रवेशद्वार गेट, खेळाडू फलक व राष्ट्रीय प्रतीके, नवीन फरशी बसविणे, मजबुत फर्निचर, फॅन व विद्युत रोषणाई, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, राष्ट्रपुरुषांचे प्रेरणादायी संदेश फलक, सुसज्ज ध्वजस्तंभ. या सर्व कामांमुळे पूर्वी साधी, जीर्ण अवस्था असलेली शाळा आता आधुनिक, सुंदर आणि विद्यार्थ्यांसाठी उत्साहवर्धक शिकण्याचे केंद्र बनली आहे.

 

उपक्रमाच्या केंद्रस्थानी सामाजिक बांधिलकी –

 

अग्नीपंख फाउंडेशनने महात्मा फुले यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेला नवा उन्मेश देण्याचा संकल्प केला आहे. “शिक्षण हेच परिवर्तनाचे भांडार आहे” हा महात्मा फुलेंचा संदेश वस्तीत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये शाळेबद्दलचा आत्मविश्वास वाढला असून विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचलन रवी पंडीत यांनी केले, तर आभारप्रदर्शन गोवर्धन दरेकर यांनी मानले.

ग्रामीण भागातील दुर्लक्षित शाळांच्या विकासासाठी लोकसहभाग, सामाजिक संस्था आणि प्रशासन एकवटले तर शिक्षणाचा चेहरा कसा बदलू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. चिंचकुट वस्ती शाळेचा बदललेला लुक केवळ भौतिक विकास नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी नव्या आशा, नव्या संधी घेऊन येत आहे.ही कहाणी अनेक गावांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक ठरणार यात शंकाच नाही.