श्रीगोंदा : गेल्या वीस वर्षांपासून शहरातील घडामोडी, समस्या, संघर्ष, अडचणी आणि सर्वसामान्यांचा आवाज बनून काम करणारे नाव म्हणजे मीरा नितीन शिंदे. पत्रकारितेच्या ध्यासातून जन्मलेली त्यांची ओळख आजही श्रीगोंदेकरांच्या मनात प्रामाणिकपणाची, निर्भीड स्वभावाची म्हणून कोरली गेली आहे. राजकारणात पाऊल टाकून अवघे दोन वर्षे झाली असतानाही, लोकसेवेची खरी ओढ त्यांच्या प्रत्येक शब्दांतून जाणवते.
पत्रकारिता करत असताना अनेक ज्वलंत मुद्द्यांवर त्यांनी निर्भीडपणे लिहिले. काही वेळा सत्तेच्या, तर काही वेळा प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवावा लागला. त्या भूमिकेत कोणावरही व्यक्तिगत आकस नव्हता. तो होता फक्त एक पत्रकार म्हणून निभावलेला कर्तव्यभाव. तरीही नकळत कोणी दुखावले गेले असेल, गैरसमज झाले असतील तर त्या सर्वांसमोर मिराताईंनी नतमस्तक होत मोठ्या मनाने माफी मागितली आहे.
“मी कधीही कोणाचा वैयक्तिक द्वेष केला नाही आणि पुढेही करणार नाही. पत्रकरिता करत असताना कोणाला राग आला असेल तर मी हात जोडून क्षमा मागते,” अशा शब्दांत मिराताईंनी भावनिक आवाहन केले.
आज त्या राजकीय भूमिकेत आहेत. माजी मंत्री आदरणीय बबनराव पाचपुते आणि आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी एका सर्वसामान्य घरातील कार्यकर्तीला पुढे आणून उमेदवारी देत लोकसेवेची मोठी जबाबदारी सोपवली. हा विश्वास जपण्याची तयारी, तीव्र तळमळ आणि समर्पण त्यांच्या प्रत्येक वाक्यातून दिसून येते.
मिराताई पुढे म्हणतात “आजपर्यंत श्रीगोंद्यातील लोकांनी मला कधी प्रत्यक्ष भेटून, तर कधी फोनवरून आधार दिला.कामाचे कौतुक केले. त्याचपद्धतीने आजही माझ्या मागे उभे राहा.,माझ्या सारख्या व सुनीता ताई खेतमालिस सारख्या एकल महिलांना उमेदवारी देऊन पाचपुते यांनी महिलांना फक्त आरक्षण म्हणून नाही तर सन्मानाने उमेदवारी दिली हा आमच्या सारख्या विधवा महिलांचा खूप मोठा सन्मान आहे.बाप,भाऊ,आई बनून पाचपुते कुटूंब भक्कमपणे पाठीशी उभे राहिले आहे. मला अनुभव आहे श्रीगोंदा शहरातील लोक ज्यांना कोणी नाही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहतात. त्यांच्या पाठीशी श्रीगोंदेकर उभे राहतात… हे आपण पुन्हा एकदा दाखवून द्या.”
प्रभाग १० मधील मतदारांना दिलेली त्यांची नितांत भावनिक साद अंतःकरणाला भिडणारी आहे. “आपण माझ्यावर विश्वास ठेवा… मी कधीही आपल्याला नाराज करणार नाही.”लोकांवर निस्सीम प्रेम आणि लोकसेवेची अपरंपार इच्छा मनात बाळगणारी मिराताई शिंदे आज खऱ्या अर्थाने श्रीगोंद्यातील जनमानसासमोर मनापासून नतमस्तक झाल्याचे दिसते.त्यांचा हा प्रामाणिकपणाचा स्वर आणि भावनिक विनंती अनेकांच्या हृदयाला स्पर्शून गेली आहे.
(गणेश कविटकर, श्रीगोंदा)
