श्रीगोंदा | दि. 15 जून 2026
गणेश कविटकर
श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या वतीने वाहनांच्या काचांवर लावण्यात येणाऱ्या बेकायदेशीर काळ्या फिल्मविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून रविवारी करण्यात आलेल्या कारवाईत विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ६३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काही चारचाकी वाहनांना काळ्या काचा लावून त्यांचा वापर अवैध व्यवसाय, जनावरांची तस्करी तसेच गुन्हेगारांना पळून जाण्यासाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्याने कार सजावट व रेडियम व्यावसायिकांची बैठक घेऊन वाहनांना आरटीओच्या मान्यतेशिवाय काळ्या काचा बसविणे तसेच एचएसआरपी (HSRP) क्रमांक प्लेटशिवाय इतर कोणत्याही प्रकारच्या नंबर प्लेट तयार न करण्याबाबत सूचना दिल्या. यासंदर्भात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ अन्वये नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.
मोहीमेदरम्यान १३ वाहनांवरील काळी फिल्म, २ वाहनचालकांकडे परवाना नसणे, ८ जणांकडून हेल्मेटचा वापर न करणे, ४ ट्रिपल सीट, १ वाहनात जादा प्रवासी, १ मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक, २ वाहनचालकांकडून सीट बेल्टचा वापर न करणे, १ वाहन विना क्रमांक आणि ४० नो पार्किंग प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल आजिनाथ जाधव व गोरख जाधव यांनी ही मोहीम राबविली.
पोलिसांनी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, बेकायदेशीर काळ्या काचा व अनधिकृत नंबर प्लेटचा वापर टाळावा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला आहे.
