जप्त गुटखा पुन्हा बाजारात पोहोचला ?

श्रीगोंद्यातील कारवाईत उघड झाली धक्कादायक बाब; गोण्यांवर आढळला पोलिसांचा सीआर क्रमांक, चौकशीची मागणी

श्रीगोंदा | दि. 15 जून 2026

गणेश कविटकर

स्थानिक गुन्हे शाखेने श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्ता परिसरात केलेल्या छापेमारीत लाखो रुपयांचा सुगंधी गुटखा जप्त केला. मात्र या कारवाईत समोर आलेल्या एका गंभीर बाबीमुळे संपूर्ण पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. ज्या गोण्यांमध्ये हा गुटखा साठवून ठेवण्यात आला होता, त्या गोण्यांवर पोलिस खात्याचा “सीआर ४६३/२६” असा सांकेतिक क्रमांक आढळून आल्याने हा गुटखा यापूर्वीच्या एखाद्या पोलिस कारवाईत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मुम्मुका सुदर्शन यांनी जिल्हाभरात अवैध धंद्यांविरोधात कठोर मोहीम सुरू केली आहे. त्याच मोहिमेचा भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी पेडगाव रस्ता परिसरातील एका ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत विविध कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात सुगंधी गुटखा आढळून आला. पोलिसांनी तातडीने मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाई सुरू केली.

मात्र कारवाईदरम्यान गुटखा भरलेल्या गोण्यांवर पोलिस विभागाचा सांकेतिक गुन्हा क्रमांक आढळून आला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. सामान्यतः पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालावर संबंधित गुन्ह्याचा क्रमांक नमूद केला जातो. अशा परिस्थितीत हा गुटखा पूर्वीच्या एखाद्या कारवाईत जप्त करण्यात आलेला असल्यास तो पुन्हा बाजारात कसा पोहोचला, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या प्रकरणामुळे अनेक गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. जर हा मुद्देमाल यापूर्वी पोलिसांच्या ताब्यात होता, तर तो पुन्हा संबंधित विक्रेत्याकडे किंवा इतरांच्या माध्यमातून कसा गेला? पोलिस कोठारातून किंवा जप्त मालाच्या साठवण प्रक्रियेत काही अनियमितता झाली का? यामध्ये कोणत्या व्यक्ती अथवा यंत्रणेचा सहभाग आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता चौकशीतूनच समोर येणार आहेत.

विशेष म्हणजे, एकाच मुद्देमालाची दोन वेळा जप्ती झाल्याची चर्चा शहरात आणि पोलिस वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. जप्त मुद्देमालाच्या नोंदी, पंचनामे, मालखाना रजिस्टर आणि संबंधित गुन्ह्याची कागदपत्रे तपासल्यास या प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

चौकशीनंतरच सत्य समोर येणार

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक मुम्मुका सुदर्शन यांनी चौकशीचे संकेत दिले आहेत. “या प्रकरणाची सखोल चौकशी करून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

आता या चौकशीतून नेमके सत्य काय समोर येते आणि जप्त गुटख्याचा पोलिसांच्या सीआर क्रमांकाशी असलेला संबंध काय आहे, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.