विखेंचा मास्टरस्ट्रोक! ADCC बँकेत घुले अध्यक्ष जिल्ह्यात राजकीय समीकरणं पालटली….

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमनपदासाठी आज (सोमवार, दि. 24) पार पडलेल्या निवड प्रक्रियेत माजी आमदार आ. चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

सकाळी ११ वाजता जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची अधिकृत बैठक घेण्यात आली.

 

याआधी सकाळी ९ वाजता नगर येथील राज पॅलेसमध्ये संचालकांची अनौपचारिक चहापान बैठक झाल्याचे समजते. या बैठकीतच अध्यक्षपदासाठी घुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि त्यानंतर झालेल्या अधिकृत बैठकीत त्यांची निवड एकमताने पार पडली.

 

या संपूर्ण प्रक्रियेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पडद्यामागील भूमिका निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

घुले हे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे सासरे असल्याने, काळे–विखे यांच्यातील सध्याचा समन्वय या निवडीमागील महत्त्वाचा घटक ठरल्याचे निरीक्षकांचे मत आहे.यामुळे विखे पाटील यांनी पुन्हा एकदा जिल्ह्यातील सहकार राजकारणातील आपली पकड मजबूत केल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

 

चेअरमन निवडीसाठी मतदानाधिकार असलेल्या संचालकांमध्ये—

मोनिका राजळे, आण्णासाहेब म्हस्के, अंबादास पिसाळ, अमोल राळेभात, आशा तापकीर, भानुदास मुरकुटे, सीताराम गायकर, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, आशुतोष काळे, प्रशांत गायकवाड, अनुराधा नागवडे, अमित भांगरे, गीतांजली शेळके, माधवराव कानवडे, करण ससाणे, गणपतराव सांगळे व शंकरराव गडाख—या सदस्यांचा समावेश होता.

 

निवड प्रक्रियेपूर्वीच अनेक संचालकांनी भविष्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने विखे पाटील गटासोबत राहणे अधिक हिताचे असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे घुले यांच्या समर्थनाचा कल एकतर्फी असल्याचे पाहायला मिळाले.

 

 

बिनविरोध निवडीनंतर आ. चंद्रशेखर घुले पाटील यांनी सर्व संचालकांचे मनःपूर्वक आभार मानले.तसेच, “नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या सहकार्यामुळेच ही जबाबदारी पार पडली,” असे सांगत विखे पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.