अहिल्यानगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या रक्ततुटवड्याची तातडीची गरज ओळखत शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचलित शिवदुर्ग वारसा संवर्धन समिती यांच्या वतीने घारगाव येथे सहावे रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले. श्रीगोंदा, घारगाव, काष्टी, लोणी व्यंकनाथ, बेलवंडी बु. या परिसरातील नागरिकांचा उल्लेखनीय सहभाग मिळत एकूण ५२ पिशव्या रक्तदानाचा अमूल्य साठा निर्माण झाला.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन रमेश कळमकर, शरद खोमणे, आप्पासाहेब शिंदे, राजेंद्र भापकर, निखिल महाडिक, नंदू थिटे, प्रकाश थिटे, मोहन थिटे, सतिश निंभोरे व कुणाल बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
घारगाव टीमच्या शिलेदार मावळ्यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कळमकर, तसेच सोमेश शिंदे, तुषार चौधरी, प्रणव गलांडे, चेतन चौधरी आणि राजेंद्र भापकर यांनी जबाबदाऱ्यांचे काटेकोर नियोजन करत शिबिर यशस्वी केले.
२०० नागरिकांची सह्यांची मोहीम – पानिपत वीरांच्या वारशासाठी नागरिक एकत्र!
याच ठिकाणी पानिपत वीरांचा वारसा जपण्यासाठी शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीकडून एक विशेष सही अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत तब्बल २०० नागरिकांनी सही करून वारसा संवर्धनासाठी आपला आवाज उंचावला.
समाजकार्याची प्रेरणा देणारी भूमिका –
शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे रक्तदान, वारसा संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचे उपक्रम हा स्थानिक पातळीवरील नव्या जागृतीचा प्रेरणादायी संदेश आहे. समाजासाठी वेळ, श्रम आणि रक्त अर्पण करणारे हे मावळे नव्या पिढीसाठी आदर्शवत आहेत.
“आपण दिलेली एक पिशवी रक्ताची भेट एखाद्या जीवासाठी नवी उमेद ठरू शकते,” असा संदेश यशस्वी रक्तदान शिबिरातून उमटला.
(गणेश कविटकर, श्रीगोंदा)
