४१ वर्षांच्या महिलेच्या नावावर बोगस मतदानाचा प्रयत्न; तरुणी ताब्यात, मतदान केंद्रावर वाद घालणाऱ्या दोन जणांवर पोलिसांची कारवाई…

श्रीगोंदा (प्रतिनिधी) :

श्रीगोंदा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ ब मधील एका जागेसाठी सुरू असलेल्या निवडणुकीदरम्यान बोगस मतदान होत असल्याच्या संशयावरून मोठा गोंधळ निर्माण झाला. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार बाचाबाची होऊन मतदान केंद्राच्या परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

प्रभाग क्रमांक ७ ब मधील मतदान प्रक्रिया सकाळपासून सुरळीत सुरू होती. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत सायंकाळ अखेर २२५४ पैकी १९६१ मतदान झाले असून एकूण ७६.७८ टक्के मतदान झाले. मात्र मतदान सुरू असतानाच काही मतदारांनी मतदानाचे फोटो काढल्याची तक्रार उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी केल्याने निवडणूक निरीक्षकांनी मतदान केंद्रावर भेट देत पाहणी केली व अशा प्रकारांवर कारवाईच्या सूचना दिल्या.

यानंतर काही वेळातच बोगस मतदान होत असल्याच्या संशयावरून भाजप व शिवसेना उमेदवार तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला. या वादामुळे मतदान केंद्रात व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अतिरिक्त बंदोबस्त तैनात करत वेळीच हस्तक्षेप केला.

दरम्यान, निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच ४१ वर्षांच्या एका महिलेच्या नावावर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. संबंधित महिलेच्या नावावर मतदान करण्यासाठी आलेल्या एका तरुण मुलीला निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे मतदान केंद्र परिसरात खळबळ उडाली.

तसेच मतदान केंद्राच्या परिसरात गोंधळ घालणाऱ्या दुसऱ्या प्रभागातील एका नगरसेवक पदाच्या उमेदवाराला आणि एका नगरसेविका पदाच्या उमेदवाराच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे काही काळ वातावरण अधिक तणावपूर्ण झाले असले तरी प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

निवडणूक निर्णय अधिकारी व तहसील प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण प्रकाराचा आढावा घेतला. नागरिकांनी शांतता राखून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व संबंधितांची चौकशी सुरू असून, मतदान यादी, ओळखपत्रे तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

(गणेश कविटकर, श्रीगोंदा)