श्रीगोंदा : प्रभाग क्रमांक ७ ब मधील निवडणूक प्रचारादरम्यान आपण नगराध्यक्ष व नगरसेवक असताना लक्ष्मी नगर, इंदिरा नगर, हनुमान नगर, साई नगर, रविवार पेठ व कुंभारगल्ली येथील रस्ते तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटची महत्त्वपूर्ण कामे केल्याची माहिती मतदारांना दिल्यानंतर, आमदार विक्रम पाचपुते यांनी सदर कामे आपणच केल्याचा दावा प्रसारमाध्यमांत केल्याने माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी यावर तीव्र आश्चर्य व्यक्त केले आहे.
पत्रकारांशी बोलताना मनोहर पोटे म्हणाले की, सदर विकासकामे कोणाच्या शिफारशीवरून, कोणत्या काळात आणि कोणत्या मंत्र्यांच्या माध्यमातून झाली, याचे ठोस पुरावे सादर करण्यास आपण तयार आहोत. विरोधकांकडे जर याबाबत काही पुरावे असतील, तर त्यांनी ते जनतेसमोर मांडावेत, असे खुले आव्हान त्यांनी दिले.
पोटे पुढे म्हणाले की, आपण नगराध्यक्ष असताना प्रभागात अनेक रस्त्यांची कामे करण्यात आली. त्यानंतर २०१९ ते २०२४ या कालावधीत सौ. शुभांगी पोटे नगराध्यक्ष असताना आणि आपण जुना प्रभाग क्रमांक ४ (सध्याचा प्रभाग क्रमांक ७) मधून नगरसेवक म्हणून काम पाहत असताना रविवार पेठेतील धुळीमुळे नागरिक त्रस्त असलेला रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यात आला. या रस्त्यावरून सर्व प्रमुख मिरवणुका जात असल्याने हे काम अत्यंत आवश्यक होते. या कामांचा कालावधी, निधी मंजुरी आणि संबंधित कागदपत्रे आजही ऑनलाइन उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“आम्ही केलेल्या कामांमुळेच आज विरोधकांना प्रचारासाठी फिरावे लागत आहे,” असा टोला लगावत पोटे म्हणाले की, या सर्व विकासकामांसाठी तत्कालीन नगरविकास मंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव निधी दिला असून, या कामांचे श्रेय संपूर्णपणे एकनाथ शिंदे यांनाच जाते.
शेवटी, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भविष्यातही अधिकाधिक विकासकामे करण्यासाठी येत्या शनिवारी होणाऱ्या निवडणुकीत आपल्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी मतदारांना केले.
