“शाळेच्या विकासाची नवी दिशा: मधुकर काळाणेंची अध्यक्षपदी निवड”

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्रीगोंदा शुगरच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या अध्यक्षपदी मधुकर रामभाऊ काळाणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमानुसार, माजी विद्यार्थी संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यासभेत ही निवड पार पडली. शाळेच्या विकासाबरोबरच माजी विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद, सहकार्य आणि नव्या उपक्रमांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने काळाणे यांची निवड महत्वाची मानली जात आहे.

सभेदरम्यान संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे, मार्गदर्शन शिबिरे, करिअर काउंसिलिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत अशा विविध उपक्रमांना चालना देण्याबाबत चर्चा झाली. या सर्व उपक्रमांना बळकटी देण्यासाठी नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून अधिक व्यापक व परिणामकारक पद्धतीने काम करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर मधुकर काळाणे यांनी विश्वास व्यक्त केला की, “शाळेचा सर्वांगीण विकास, माजी विद्यार्थ्यांचा एकीचा भाव आणि नव्या पिढीसाठी संधी निर्माण करणे हे माझे प्राधान्य असेल. संघटनेच्या माध्यमातून समाजकारणातही भरीव योगदान देण्याचा प्रयत्न करू.”

सभेत उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि कार्यकारी सदस्यांचीही निवड प्रक्रिया सर्वानुमते पार पडली. लवकरच संघटनेतर्फे वर्षभरासाठी विविध उपक्रमांची रूपरेषा जाहीर करण्यात येणार आहे.श्रीगोंदा परिसरातील शिक्षण क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावणारी ही संघटना नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून अधिक प्रभावी कार्य करण्याच्या दिशेने वाटचाल करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

(गणेश कविटकर, श्रीगोंदा)