श्रीगोंदा तालुक्यात आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त सहकारी पतसंस्थांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात सम्पन्न

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 व आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताहानिमित्त महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, पुणे; जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहिल्यानगर; तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा तालुक्यातील नागरी/ग्रामीण बिगरशेती/सेवक सहकारी पतसंस्थांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम महेश्वर मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., काष्टी (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांच्या सभागृहात पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विक्रम पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहिल्यानगर मंगेश सुरवसे होते. तर प्रस्ताविक भाषण सह-निबंधक (से.नि.) तथा राज्य समन्वयक MCDC पुणे धनंजय डोईफोडे यांनी केले.

प्रशिक्षण सत्रात विविध तज्ञ वक्त्यांनी महत्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. किरण पाटोळे यांनी सायबर सिक्युरिटी आणि अँटी मनी लॉंड्रींग याबाबत पतसंस्थांनी घ्यावयाची काळजी स्पष्ट केली. डॉ. प्रशांत खोपटीकर यांनी थकीत कर्ज वसुली प्रक्रिया व त्यातील दक्षता यावर उपयुक्त माहिती दिली. मंगेश देहडेकर यांनी ठेव संकलन, निधी व्यवस्थापन आणि ग्राहक संबंध यावर सखोल मार्गदर्शन केले. तानाजी कवडे, सहनिबंधक लेखापरीक्षण (से.नि.) पुणे यांनी पतसंस्थांचे सुधारित मापदंड स्पष्ट केले.

कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून तानाजी कवडे (सहनिबंधक लेखापरीक्षण, पुणे), नारायण परजणे (सहाय्यक निबंधक, श्रीगोंदा), दत्तात्रय गावडे (संस्थापक चेअरमन—महेश्वर मल्टीस्टेट व महेश्वर पतसंस्था), अनिल भदागरे (उपाध्यक्ष, महेश्वर पतसंस्था), एकनाथजी आळेकर (संस्थापक चेअरमन—इंदिरा पतसंस्था, श्रीगोंदा) आदींसह विविध पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आर्थिक शिस्त बळकट करणे, जोखीम व्यवस्थापन सुधारणा, नैतिकता व कामकाजातील पारदर्शकता वाढविणे, तांत्रिक आणि डिजिटल कौशल्ये विकसित करणे हा होता.

सहकारी पतसंस्थांच्या कार्यक्षमता वाढीसाठी आणि सुरक्षित, पारदर्शी कामकाजासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत सहभागींकडून व्यक्त करण्यात आले.